सोलापूर : एकमेकांच्या संपर्कातून सोलापूर जिल्ह्यातील १६ पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित झाले असून आणखी किमान शंभर पोलिसांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
कोरोनाची लागण झालेले हे १३ पोलीस कर्मचारी सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील आहेत, तर तीन पोलीस कर्मचारी सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील आहेत. यातील एका सहायक फौजदाराचा मृत्यू झाला आहे. देशभरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन तथा कर्फ्यू लागू झाल्यानंतर देशासह राज्यातील पोलीस २३ मार्चपासून रात्रंदिवस रस्त्यावर पहारा देत आहेत. यापैकी काही पोलीस तर कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये स्वत:चा जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत. सोलापूर शहरातील तेलंगी पाच्छा पेठेत १२ एप्रिल रोजी कोरोनाबाधित पहिला रुग्ण सापडल्यानंतर त्यापाठोपाठ रुग्णांची संख्या उत्तरोत्तर वाढत चालली आहे. शनिवारपर्यंत २८ दिवसांत कोरोना रूग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत १५६ वर जाऊ न पोहोचली आहे. यात १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्त भाग बहुतांश दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या झोपडपट्टय़ांशी संबंधित आहे.
सोलापुरात एकमेकांच्या संपर्कामुळे रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत असताना सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना गेल्या आठवडय़ात कोरोनाबाधा झाल्याचे दिसून आले होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना विलगीकरण कक्षात हलवून त्यांची वैद्यकीय चाचणी घेतली असता त्यापैकी आणखी दोन पोलिसांना कोरोनाबाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पुन्हा नऊ पोलिसांना कोरोनाने ग्रासल्याचे आढळून आले. तर दुसरीकडे सोलापूर शहरातील तीन पोलिसांनाही कोरोनाची बाधा झाली असून यातील एका सहायक फौजदाराचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या संपर्कातील शंभरपेक्षा अधिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही वैद्यकीय चाचणी करण्यात येत असून त्याचे निष्कर्ष अद्यापि समोर आले नाहीत. एकंदरीत पोलिसांना कोरोनाचा विळखा पडू लागल्यामुळे यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.