शिरसोलीतील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात
गुणवंत माजी विद्यार्थ्यांच्या फलकाचे अनावरण; देशभक्तीपर कार्यक्रमांसह नशामुक्त भारताची विद्यार्थ्यांनी घेतली शपथ


शिरसोली | प्रतिनिधी — शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात भारताचा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. संस्थेचे विद्यमान सल्लागार संचालक नंदकिशोर पितांबर लावणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ॲड. निलेश भाऊ खलसे, शालेय समितीचे चेअरमन दिलीप भाऊ बारी, सचिव सुरेशभाऊ अस्वार, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज बारी, खजिनदार कमलाकर तांदळे यांच्यासह संचालक मंडळातील प्रवीण पाटील, शशिकांत वाणी, अशोक काटोले, गिरीश वराडे, रामकृष्ण धनगर, अर्जुन काटोले, उमाकांत बारी, भास्कर बारी, अशोक बारी आदी उपस्थित होते. संस्थेचे माजी अध्यक्ष रामदास नारायण बारी, सुभाष बुंधे, यादव रुपला बारी तसेच संस्थेचे सर्व संचालक, सभासद, मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर, प्रभारी पर्यवेक्षक सुनील भदाणे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्यदिनानिमित्त सांस्कृतिक विभागाच्या वतीने माध्यमिक, प्राथमिक आणि बालवाडीतील विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले. देशभक्तीपर गीते, संगीत कवायत, समूह नृत्य, वेशभूषा आणि भाषणांच्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची दाद मिळवली. संगीत कवायतीसाठी क्रीडा शिक्षक संजय काटोले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी उभारण्यात आलेल्या गुणवंत माजी विद्यार्थी फलकाचे अनावरण करण्यात आले. रेल्वे अधिकारी, डॉक्टर, अभियंते, शिक्षक, पोलीस अधिकारी अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांची माहिती या फलकावर देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी आणि शिक्षणानंतर विविध क्षेत्रांत यशस्वी होण्याची जिद्द निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या संकल्पनेची मांडणी दिलीप भाऊ बारी आणि ॲड. निलेश भाऊ खलसे यांनी केली असून, त्यासाठी शिक्षकांचे सहकार्य लाभले.
सांस्कृतिक कार्यक्रमात योगदान देणाऱ्या शिक्षकांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनी ‘नशामुक्त भारत’ घडविण्याची शपथ घेतली. स्वातंत्र्यदिनाचा संदेश विद्यार्थ्यांच्या मनात रुजवतानाच व्यसनमुक्त समाजनिर्मितीचा संकल्पही यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ए. टी. बावस्कर यांनी केले. सूत्रसंचालन जी. बी. काळे यांनी, तर आभार प्रदर्शन सी. एस. कुमावत यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. उत्स्फूर्त सहभागामुळे विद्यालयातील स्वातंत्र्यदिनाचा सोहळा आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.






