मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यातील राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर करण्यात आल्यानंतर महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेनंही आपला उमेदवार जाहीर केला आहे. माजी मंत्री दिवाकर रावते,जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांची नावे राज्यसभेसाठी चर्चेत होती मात्र शिवसेनेकडून पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असलेले हिंगोलीचे माजी खासदार राजीव सातव यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आल्याची माहिती आहे. राजीव सातव यांच्या उमेदवारीविषयी काँग्रेसकडून अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी आहे.राजीव सातव हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे गुजरात प्रभारी आहेत. तर काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक आहेत. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार होत्या.
दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाने नाराज असणाऱ्या माजी मंत्री एकनाथ खडसे यांची राज्यसभेची उमेदवारी रद्द केली आहे. तर संजय काकडे यांचा पत्ता कट करत औरंगाबादचे माजी महापौर डॉक्टर भागवत कराड यांची उमेदवारी जाहीर केली आहे. डॉक्टर कराड यांना उमेदवारी देताना भाजपने पुन्हा एकदा ओबीसी कार्ड चालवले आहे.भाजपने पहिल्या यादीत महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांना उमेदवारी दिली आहे. त्यानंतर आता भागवत कराड यांनाही उमेदवारी देऊन 7 पैकी 3 जागांवर दावा केला आहे.
राज्यसभेच्या दहा जागांसाठी आज उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. दहापैकी तीन जागा भाजपच्या वाट्याला येणार आहेत. तर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांना प्रत्येकी दोन-दोन जागा मिळणार आहेत. पण विधानसभेत महाआघाडीच्या आमदारांची संख्या पाहता, त्यांना सात खासदारांचा कोटा मिळेल. भाजपच्या तीन जागांसाठी माजी मंत्री एकनाथ खडसे आणि संजय काकडे यांची नावे चर्चेत होती. पण अचानकपणे खडसे आणि काकडे यांचे पत्ते साफ करत भाजपने औरंगाबादचे माजी महापौर डॉक्टर भागवत कराड यांची उमेदवारी जाहीर केली आहे.औरंगाबाद महापालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे कराड नंतर भाजपमध्ये दाखल झाले. गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली करडांना पक्षपातळीवर वेगवेगळ्या पदांवर काम करण्याची संधी मिळाली.मुंडे यांच्या नंतर पंकजा मुंडे यांचेही नेतृत्व कराड यांनी मान्य केले. मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष असणाऱ्या कराड यांनी औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. आता त्यांना भाजपने थेट राज्यसभेची उमेदवारी देऊ केली आहे. कराड यांना खासदार करून भाजपने औरंगाबाद लोकसभा लढविण्याचा बिगुल वाजवला आहे.