जळगाव: विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होऊन त्यांना नोकरी, व्यवसाय, रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने सुरेशदादा शैक्षणिक व उद्योजक विकास योजना जळगाव यांचे मार्फत दोन दिवसीय “एसडी-सीड उद्योजकता विकास शिबिर” नुकतेच भागीरथी आय.टी.आय. जळगाव येथे संपन्न झाले.
नव उद्योजाकांसाठी कृषी क्षेत्रात प्रचंड संधी – अनिल भोकरे
एसडी-सीड च्या उद्योजकता विकास शिबिरात केले मार्गदर्शन
“कृषी क्षेत्रात कमी खर्चात व कमी वेळेत सुरु करता येतील असे अनेक विध उद्योग व्यवसाय उपलब्ध असून त्यासाठी अनेक सवलती आहेत तसेच वित्त पुरवठा सहज उपलब्ध होईल अशी परिस्थिती असल्याने तरुणांनी मोठ्या संख्येने याचा लाभ घ्यावा” असे उद्गार कृषी उपसंचालक श्री अनिल भोकरे यांनी एसडी-सीड आयोजित उद्योजकता विकास शिबिरात मार्गदर्शन करतांना काढले.
शिबिराचे उद्घाटन भागीरथी आय.टी.आय चे प्राचार्य श्री. आर.के.पाटील यांचे शुभ हस्ते झाले. उद्घाटन प्रसंगी एसडी-सीड गव्हर्निंग बोर्ड चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, डॉ. किसन पाटील, श्री. नंदलाल गादिया, श्री. महेश गोरडे, प्रा.सुरेश पांडे या उपस्थितांनी मार्गदर्शन केले. या दोन दिवसीय शिबिरात ९० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
शिरपूर येथील श्री .साजिद पटेल यांनी यशस्वी उद्योजक होण्यासाठीची गुणवैशिष्ट्ये व त्यांनी अंगीकारावयाच्या बाबी याबाबत मार्गदर्शन केले. सौ. अपूर्वा वाणी यांनी उद्योजकतेची मानसिकता, व्यवस्थापन, संभाषण कौशल्य, विक्री कौशल्य या बाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
लक्ष्मी अग्रो सेल्स व ग्रीन स्टार या कंपनीच्या कार्यकारी संचालिका सौ. संध्या सूर्यवंशी यांनी कंपनीच्या विकासाचा आलेख सादर करतांना अनेक विध टिप्स देवून उद्योग सुरु करण्यासाठी मुलभूत माहिती, निर्णयांची जबाबदारी, धोके, विक्री व्यवस्थापन, आर्थिक नियोजन, निष्ठा, संयम, कर्ज, उत्पादनाची गुणवत्ता, या बाबत तपशीलवार चर्चा केली.
जसलीन इंडोसर्जिकलचे श्री. उमेश सोनार यांनीही स्वतःच्या उद्योगाच्या प्रगतीचा टप्पा उलगडून दाखवितांना स्वत:च्या बलस्थानांचा वापर करून संधी घेत आपला उद्योग आपल्यालाच मोठा करता येतो हे स्वतःच्या उदाहरणासह स्पष्ट केले.
जळगाव जनता बँकेचे अधिकारी श्री बापू बोरसे व श्री. अजय कोतवाल यांनी कर्जाची उपलब्धता, कर्जाचे प्रकार, लागणारी कागदपत्रे याबाबत छान माहिती दिली व नव उद्योजकांना सहकार्याचे आश्वासनही दिले.
जिल्हा कौशल्य विकास व स्वयंरोजगार केंद्राचे श्री. दीपक बोरसे व श्री. देशपांडे या अधिकाऱ्यांनी शासनाच्या विविध योजना व सवलतींची तपशीलवार माहिती दिली. प्रा. सुरेश पांडे यांनी शिबिराचा समारोप केला.
या शिबिराच्या यशस्वितेसाठी श्री. नीलकंठ गायकवाड, प्रा. एस.व्ही.सोमवंशी, श्री. प्रवीण सोनवणे, श्री. एम.डी. चोपडे यांनी परिश्रम घेतले व भागीरथी आय.टी.आय.च्या स्टाफने चांगले सहकार्य केले.
एसडी सीड उपक्रम
एसडी सीडचा अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याचा मानस आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या soft skill development, वेळेचे नियोजन, इंग्रजी संभाषण कौशल्य, ध्येय निश्चिती, परीक्षेला सामोरे जातांना यासारख्या महत्वाच्या विषयांवर आणि वेगवेगळे प्रकल्प बनविणे (Project making) सारख्या उपक्रमांमधून विद्यार्थांमधील सुप्त कौशल्यांचा विकास होणेसाठी तसेच शिक्षक आणि पालकांसाठीसुद्धा योग्य ते समुपदेश व्हावे यासाठी शिक्षण प्रणालीमधील विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या तिन्ही घटकांवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करून शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी आणि एक यशस्वी, संस्कारक्षम समाज निर्मितीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न एसडी सीडच्या माध्यमातून केले जात आहेत.
ही दोन दिवसीय कार्यशाळा यशस्वी होण्याकरिता भागीरथी आयटीआय प्राचार्य श्री. आर.के.पाटील व व्यवस्थापन यांच्या बद्दल एसडी-सीड गव्हार्निग बोर्ड चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे