मुंबई (वृत्तसंस्था) – महाराष्ट्रात ज्योतिरादित्य सिंधिया होणार नाही. भाजपला 5 वर्ष अशीच काढावी लागणार, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी त्यांना टोला लगावला आहे. अजित पवारांचा कॉन्फिडन्स मानावा लागेल. ज्या भाजपसोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली पण एकही आमदार सोबत नाही म्हणून राजीनामा दिला त्याच भाजपला आज टोला मारतायत, असं ट्वीट निलेश राणे यांनी केलं आहे.मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य सिंधिया यांनी जसा भाजपप्रवेश केला तसा महाराष्ट्रात देखील कुणीतरी ज्योतिरादित्य तयार होईल, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते. मुनगंटीवारांच्या याच वक्तव्यावर अजित पवारांनी विधानसभेत बोलताना टोलेबाजी केली होती.विधानसभेत फटकेबाजी करताना, मी लपून छपून काही करत नाही. तिथंही गेलो अन् इथंही मजबुतीत बसलो. इकडचा कोणी ज्योतिरादित्य शिंदे होणार नाही. तिकडचाच कोणी होईल याची काळजी घ्या. आज बरेच जण गैरहजर आहेत, असंही सांगायला अजित पवार विसरले नव्हते.