जळगाव ( प्रतिनिधी ) ;- जिल्हा परिषदेच्या आरोग्या विभागाकडून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रॅपिड अँटीजेन टेस्ट किट खरेदी करण्यात आली होती . मात्र राज्याच्या तुलनेत जळगाव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने अँटीजेन टेस्ट किट खरेदीची किंमत आणि इतर जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागाकडून खरेदी करण्यात आलेल्या किंमतीमध्येही मोठी तफावत दिसून येत असल्याने यातही अनेकांचे हात भ्रष्टाचाराने ‘बरबटलेले’ असल्याचे समोर येत आहे.
मार्च २०२१ मध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने शासन निर्णय तातडीच्या खरेदीनुसार कोव्हीड १९ अंतर्गत लागणाऱ्या औषधी व साहित्य सामुग्री धोरणानुसार ६६ रुपये प्रति नग याप्रमाणे गुजरातमधील मेरील कंपनीकडून सुमारे ४८ लाख रुपयांचे ७३ हजार ९०० अँटीजेन टेस्ट किट खरेदी केले होते. तसेच त्याच मार्च महिन्यात दुसऱ्यांदा मेरील कंपंनीकडून दर कराराच्या माध्यमातून ७६ लाख रुपयांचे १ लाख १५ हजार अँटीजेन टेस्ट किटचे नग खरेदी केले आहे. या खरेदीमध्ये कंपनीकडून घेण्यात आलेल्या अँटीजेन किटच्या किमतीमध्ये तफावत असल्याची जिल्हा परिषदेच्या सदस्यांमध्ये सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान याबाबत आरोग्य विभागाने नुकताच अँटीजेन टेस्ट किट खरेदीचा प्रस्ताव पुन्हा दर कराराच्या माध्यमातून सध्याचे सीईओ पंकज आशिया यांच्याकडे पाठविला होता. मात्र सीईओनी कोटेशननुसार टेंडर प्रक्रिया राबवून खरेदी करण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्यातील इतर जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागाकडून किमान ४६ रुपयांपर्यंत अँटीजेन टेस्ट खरेदी केल्याचे म्हटले जात आहे. सध्या कार्यरत सीईओ पंकज आशिया हे भिवंडी येथे कार्यरत असताना त्यांनी गुजरातमधील मेरील कंपनीकडून प्रत्येकी नग ४६ रुपये दराने अँटीजेन टेस्ट किट खरेदी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र ४६ रुपयांच्या तुलनेत जवळपास २० रुपये प्रति नग या जादा दराने म्हणजेच ६६ रुपयांना अँटीजेन टेस्ट किट विकत घेण्याचा ‘प्रताप’ जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून घेण्यात आल्याने या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. या अँटीजेन टेस्ट किट खरेदी प्रकरणात कोण कोण गुंतले आहेत हे पाहणे गरजेचे असून आता जिल्हा परिषदेचे सदस्य येत्या काही दिवसांत याविरुद्ध आवाज उठविणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.