चोपडा तालुक्यातील अडावद येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : चोपडा तालुक्यातील अडावद येथे भंडारगृहामध्ये लावलेला टि.व्ही. संच, रिमोट कन्ट्रोल असा एकुण १५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला. अडावद येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय मुलांची शाळेत ही घटना मंगळवार दिनांक २३ रोजी उघडकीस आली. या प्रकरणी सोमवार २९ रोजी अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
अडावद येथील केंद्रीय शाळेत इयत्ता तिसरीचा वर्ग व भंडारगृहामध्ये ४२ इंचीचा टीव्ही संच विद्यार्थ्यांसाठी लावलेला होता. २२ जुलैच्या संध्याकाळी ५ ते २३ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान चोरट्याने शाळेत प्रवेश केला. त्यानंतर इयत्ता तिसरीचा वर्ग तसेच भंडार गृहाच्या दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. खोलीमधील १५,१०० रुपये किमतीचा टीव्ही संच, रिमोट कन्ट्रोल असे साहित्य घेत चोरटे पसार झाले.
प्रकार लक्षात आल्यानंतर या प्रकरणी केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप महाजन (वय ५३, रा. गजानन नगर, अडावद) यांनी तक्रार दिली. त्यानुसार अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सहायक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण यांच्यासह कर्मचाऱ्यांनी शाळेत जाऊन पाहणी करत माहिती घेतली. गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्सटेबल शेषराव तोरे हे करीत आहेत.