८ लाख ८४ हजार रुपयांची वस्तूरूपी,आर्थिक मदत प्राप्त
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे भौतिक व शैक्षणिक विकासासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी माजी विद्यार्थ्यांच्या सामाजिक व भावनिक नात्याला नव्या ऊर्जेचा स्पर्श देणारा “माजी विद्यार्थी संघ” हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. दि. ४ एप्रिल २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित एका विशेष कार्यक्रमात करनवाल यांनी ही संकल्पना जाहीर केली होती.
त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक शाळेत माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याचे आवाहन केले होते. या उपक्रमाला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत, १६२५ शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघांची स्थापना करण्यात आली आहे. या संघांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळांना आतापर्यंत ८ लाख ८४ हजार ५६० रुपयांची वस्तूरूपी व आर्थिक मदत मिळाली आहे. यात बेंच-डेस्क, स्मार्ट टीव्ही, संगणक, पुस्तके, क्रीडा साहित्य, फर्निचर, पंखे, टाईल्स, रंगकाम, शाळा फलक, तसेच काही ठिकाणी आर्थिक स्वरूपात देणगी यांचा समावेश आहे.
जळगाव जिल्ह्यातील या संकल्पनेच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर राज्य शासनानेही या उपक्रमाची दखल घेत, “माजी विद्यार्थी संघ” या संकल्पनेचा राज्यभर विस्तार करण्याचा शासन निर्णय जारी केला आहे. परिणामी, जळगाव जिल्हा परिषदेचा हा प्रयोग आता “जळगाव पॅटर्न” म्हणून राज्यभर परिचित होत असून, इतर जिल्ह्यांनाही मार्गदर्शक ठरत आहे. माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून मिळालेल्या भेटवस्तू व निधीच्या साहाय्याने शाळांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविणे शक्य झाले आहे. शाळांच्या भौतिक सुविधांत सुधारणा, तंत्रज्ञानाधारित शिक्षणाची साधने, तसेच विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि प्रेरणादायी शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याचे काम सुरू आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल म्हणाल्या की, “माजी विद्यार्थी संघ हा केवळ आर्थिक मदतीचा उपक्रम नाही, तर तो आपल्यातील माणुसकी, कृतज्ञता आणि शाळेबद्दलच्या आपुलकीचा दुवा आहे. प्रत्येक माजी विद्यार्थी हा आपल्या शाळेचा ‘ब्रँड अॅम्बेसेडर’ आहे, आणि त्यांच्या सहभागातून शाळांचा खरा विकास घडणार आहे.”









