वेध प्रेरक कार्यशाळा २०२५ चे आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) : आजच्या काळात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी विविध उपक्रम राबविणे गरजेचे आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांमधे आत्मविश्वास निर्माण करणे काळाची गरज आहे. त्या दृष्टीने शिक्षकांनी काम करणे गरजेचे आहे.असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केले.
जिल्हा प्रशिक्षण संस्था शिक्षण विभाग प्राथमिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वेध प्रेरक कार्यशाळा २०२५ चे आयोजन १९ एप्रिल रोजी जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर राज्य वेध प्रेरक निलेश घुगे, शिक्षण अधिकारी विकास पाटील यांचेसह जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे साळुंखे, उपशिक्षणधिकारी चौधरी, सरोदे व इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल म्हणाल्या की, या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात १०० टक्के साक्षरता राबविण्याचे उद्दिष्ट आपण ठेवले आहे. शैक्षणिक गुणवत्ता ही प्रत्यक्ष दिसणे गरजेचे आहे.त्यासाठी जळगाव जिल्हा परिषद स्वतःच्या डेटा तयार करणार आहे. आपल्या वर्गातील किती विद्यार्थी प्रत्यक्ष वाचन करू शकतात याचा विचार प्रत्येक शिक्षकाने करणे गरजेचे आहे. शिक्षक वर्गात विद्यार्थ्यांना किती तळमळीने शिकवतात हे बघणे देखील महत्त्वाचे आहे.
शिक्षण हे समाजमनावर दूरगामी परिणाम करणारे माध्यम आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये विद्यार्थी ही आमची जबाबदारी आहे ही भावना रुजणे गरजेचे आहे. शिक्षण देत असताना नुसती घोकंपट्टी महत्वाची नाही तर विद्यार्थ्यांना व्यवहारिक जीवनात कसे उभे राहता येईल या दृष्टीने शिक्षण देणे महत्वाचे आहे असेही करनवाल यांनी यावेळी सांगितले.
शिक्षकांनी स्वतःच ही बाब ठरवायची आहे की, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता काय केल्याने वाढेल ते उपक्रम स्वत राबविण्याची गरज आहे.या साठी शिक्षकांना प्रेरणा मिळावी व शैक्षणिक गुणवत्ता वाढीची स्पर्धा निर्माण व्हावी यासाठी आगामी काळात शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी उल्लेखनीय कामगिरी करणारे शिक्षक, केंद्रप्रमुख यांच्यासाठी शिक्षण कप देण्यात येणार असल्याची घोषणा करनवाल यांनी यावेळी केली. राज्यवेध प्रेरक निलेश घुगे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना शिक्षकांशी मनमोकळ्या स्वरूपात संवाद साधत शिक्षकांच्या भावना व अडचणी जाणून घेतल्या.
वेध संमेलनाच्या माध्यमातून गुणवत्ता वाढीच्या अत्यंत महत्त्वाच्या व्यापक अशा कार्यात सहभागी होण्याची संधी शिक्षकांना प्राप्त झाली आहे.या संधीचे सोने करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असल्याचे ते म्हणाले. शिक्षणाच्या कामात वेगळेपण निर्माण करणारे शिक्षक यांची या माध्यमातून दखल घेण्यात येणार आहे.त्या साठी प्रेरक म्हणून काम करताना शिक्षकांना देखील प्रत्येक पातळीवर शिकत राहावे लागणार आहे. त्या दृष्टीने शिक्षकांनी तयारी ठेवावी असे आवाहन देखील घुगे यांनी यावेळी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षण अधिकारी विकास पाटील यांनी प्रास्ताविक केले. या कार्यशाळेत जिल्हाभरातील विविध शाळांचे १६४ शिक्षक,केंद्रप्रमुख व गटविकास अधिकारी सहभागी झाले होते.