हुबळी बागलकोट- वाराणसी एक्सप्रेस मधील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- कर्नाटकातील बागलकोट येथून वाराणसी येथे जात असलेला प्रवासी झोपेत असताना वरच्या बर्थवरून खाली पडून गंभीर जखमी झाला होता. अखेर उपचारादरम्यान चौथ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी रेल्वे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रहेमतुल्ला खान जमालोद्दीन (वय ४५, रा. गढवा जि. गढवा, झारखंड) असे मयत इसमाचे नाव आहे. तो गढवा येथे त्याच्या परिवारासह राहतो. रहेमतुल्ला याच्या पश्चात वडील, पत्नी, ३ मुले असा परिवार आहे. मजुरी करून तो उदरनिर्वाह करीत होता. कर्नाटकातील बागलकोट येथे तो गेला होता. तेथून शनिवारी तो हुबळी बागलकोट एक्स्प्रेसने वाराणसी येथे जात होता. तेथून उतरून तो त्याच्या घरी जाणार होता. मात्र रेल्वेने जळगाव स्टेशन पार केल्यावर केव्हातरी तो वरच्या बर्थवर झोपलेला असताना अचानक खाली पडला. यात तो मार लागल्याने गंभीर जखमी झाला.
आजूबाजूच्या प्रवाश्यांनी तातडीने रेल्वे प्रशासनाला कळविले. रेल्वे भुसावळ स्टेशनवर थांबल्यावर तेथील रेल्वे रुग्णालयात रहेमतुल्ला याला उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे तीन दिवस उपचार झाल्यावर त्याला जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी बुधवारी २५ ऑक्टोबरला दाखल पोलिसांनी केले. तेथे त्याचे सकाळी उपचारादरम्यान निधन झाले. रेल्वे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.