अमळनेर तालुक्यातील अमळगाव येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी):- तालुक्यातील अमळगाव येथील एका ५० वर्षीय व्यक्तीने शेतात बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दिलीप अभिमन भिल्ल (वय ५०, रा. अमळगाव, ता. अमळनेर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. रविवारी दि. २८ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास अमळगाव शिवारातील रामकृष्ण लाला चौधरी यांच्या पिंपळी रस्त्यालगत असलेल्या शेतात दिलीप भिल्ल यांनी बाभळीच्या झाडाला दोरीने गळफास घेतल्याचे आढळून आले.
सतीश भरत भिल्ल यांनी या घटनेची माहिती मृताच्या नातेवाईकांना फोनवरून दिली. त्यानंतर नितीन यशवंत भिल्ल, जयेश मगन कोळी, संजय बुधा धोबी आणि अमळगावचे पोलीस पाटील राहुल ठाकरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन खात्री केली. घटनेची माहिती मिळताच मारवड पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
पोलिसांत नोंद या घटनेबाबत मृताच्या नातेवाईकांनी मारवड पोलीस स्टेशनला माहिती दिली असून, कोणाबद्दलही संशय नसल्याचे कळवले आहे. यावरून पोलिसांनी नोंद केली आहे. मारवड पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक जिभाऊ तुकाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संजय पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









