गांधी रिसर्च फाऊंडेशन, विद्यापीठ आयोजित व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प
जळगाव (प्रतिनिधी) – तरुणाईप्रती दादा धर्माधिकारी यांना कमालीचा जिव्हाळा होता. तरुणांच्या उन्नतीसाठी तेजस्वीता, तपस्वीता व तत्परता त्यांच्यात असावी असे ते नेहमी सांगत असत, असे प्रतिपादन साम्ययोग साधनाचे संपादक रमेश दाणे यांनी केले. गांधी रिसर्च फाऊंडेशन व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ३ डिसेंबर रोजी न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी व्याख्यानमालेत त्यांनी “दादा धर्माधिकारींचे विचार आणि युवक” या विषयावर तिसरे पुष्प गुंफले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सत्यरंजन धर्मधिकारी होते तर व्यासपीठावर गांधी रिसर्च फाउंडेशनचे विश्वस्त तथा जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, विदयापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.एस. टी.इंगळे, ज्येष्ठ सर्वोदयी डॉ. सुगन बरंठ, एन. एस. एसचे सुमंतकुमार यादव, गांधी रिसर्च फाउंडेशनच्या गीता धरमपाल यांची तर समोर श्रोते म्हणून बसलेले १० राज्यांमधील एनएसएस विद्यार्थी-विद्यार्थीनींची उपस्थिती होती. २०२३ हे वर्ष महात्मा गांधींचे सहाध्यायी दादा धर्माधिकारी यांचे १२५ वे जयंती वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे त्या औचित्याने गांधीतीर्थ येथील कस्तुरबा सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.
वक्ते रमेश दाणे म्हणाले की, भविष्यात महिलाच देशाला वाचवू शकतात कारण आजची स्त्री ही शिक्षण व अन्य सर्वच क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करीत आहे. याच स्त्रिला मनुष्य बनण्याची संधी मात्र दिली जात नाही याविषयीची खंत ही त्यांनी व्यक्त केली. महात्मा गांधीजींचे विचारांचा वारसा पुढे चालविणारे दादा धर्माधिकारी, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, विनोबा भावे, जयप्रकाश नारायण यांच्या समवेतच कान्हदेशातील बाळूभाई मेहता, धनाजीनाना चौधरी, भुसावळचे आण्णासाहेब दास्ताने यांच्याबाबत सांगितले. युवकांनी जीवनात नैतिकता वाढवावी असे आवाहनही दाणे यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी अध्यक्षीय भाषणात युवकांनी संतुलन, संयम ठेवणे अपेक्षीत आहे. चांगले श्रोते बनल्या शिवाय तुम्ही बोलू शकत नाहीत. अपेक्षांची पूर्ती करणे हे आजच्या युवकांपुढील मोठे आव्हान आहे, असे सांगितले. मोबाईलचा सुयोग्य उपयोग ही करून आपल्या व्यक्तीत्वाचा विकास तरुण मंडळी करू शकतात. युवा पिढीने चिंतनशील बनावे असा सल्लाही त्यांनी दिला. गांधी रिसर्च फाउंडेशनचे विश्वस्त तथा जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक, उपाध्यक्ष अनिल जैन यांनी युवकांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अश्विन झाला यांनी तर आभार प्रदर्शन एनएसएसचे डॉ.सचिन नांद्रे यांनी केले.