जळगाव ते शिरसोली दरम्यान घडली घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- मुंबईहून गावी परतणाऱ्या यवतमाळ येथील नगरपालिका कर्मचाऱ्याचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी ११ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १ वाजता जळगाव ते शिरसोली दरम्यान घडली. या प्रकरणी दुपारी २ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मारुती मधुकर कडूकार (वय ४३, रा. नबाबपूर, जि. यवतमाळ) असे मयत कर्मचाऱ्याचे नाव आहे. मारुती कडूकार हे मुंबई येथे काही कामानिमित्त गेले होते.(केसीएन)तिथून ते आपल्या गावी यवतमाळकडे परतत असताना जळगाव ते शिरसोली स्थानकादरम्यान, खांबा क्रमांक १४३ च्या २६ ते २४ च्या दरम्यान ते धावत्या रेल्वेतून खाली पडले. ही माहिती मिळताच तालुका पोलिसांचे पोहेकॉ गुलाब माळी आणि त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कडूकार यांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
सुरुवातीला या घटनेची अनोळखी व्यक्ती म्हणून नोंद करण्यात आली होती. परंतु, मृतदेहाच्या पाकिटात आधार कार्ड आणि एक डायरी सापडली. डायरीतील मोबाईल क्रमांकावर पोलिसांनी संपर्क साधला असता, समोरची व्यक्ती मृताचा मित्र असल्याचे निष्पन्न झाले. मित्राने कडूकार यांच्या कुटुंबीयांना कळवले आणि त्यानंतर त्यांचे कुटुंबीय जळगावात आले. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात पुढील तपास सुरू असून, अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.