गांजा पुरविणाराही गजाआड : संशयितांची कोठडीत रवानगी
यावल (प्रतिनिधी) :- यावल ते चोपडा महामार्गावर ४ किलो गांजाची तस्करी करताना दोघांना यावल पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत आणि एक मोटारसायकल असा एकूण ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गांजा पुरवणाऱ्या तिसऱ्या आरोपीलाही अटक केली असून, तिघांनाही न्यायालयात हजर केले असता, त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली, यावल पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, दि. २५ ऑगस्ट रोजी यावल-चोपडा रोडवरील फॉरेस्ट कॉलनी परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी मोटारसायकलवरून गांजाची वाहतूक करणाऱ्या युसूफ शहा गुलजार शहा (वय ५५, रा. भुसावळ) आणि युनूस सुलतान शेख (वय ५१, रा. भुसावळ) या दोघांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याकडून ४ किलो गांजा आणि १ स्प्लेंडर मोटारसायकल जप्त करण्यात आली. चौकशीदरम्यान, आरोपींनी हा गांजा भानसिंग पुट्ट्या बारेला (रा. वाघझिरा, ता. यावल) यांच्याकडून १५ हजार रुपयांना विकत घेतल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी भानसिंग बारेला यालाही अटक केली.
या प्रकरणी यावल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे करत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे, उपनिरीक्षक अनिल महाजन, सफौ विजय पाचपोळे, पोहेकॉ रोहिल गणेश, पोना वसीम तडवी, पोना अमित तडवी, पोकॉ आर्षद गवळी, पोकॉ सागर कोळी आणि चापोहवा ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.