जिल्हा प्रशासनाच्या पथकाची कार्यवाही
यावल (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर तालुक्यातील अकलूद जवळ नाकाबंदी करणार्या पथकास एका वाहनात ८ लाख ६५ हजारांची रोकड मिळून आली. संबंधित वाहन मालकाला या रोकड संदर्भात योग्य खुलासा करता न आल्याने ही रोकड जप्त करून वाहनाचा पंचनामा करीत ही रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयात सुपूर्द करण्यात आली.
अकलूद, ता.यावल येथे भुसावळकडून फैजपूरकडे जाणार्या रस्त्यावर नाकाबंदी करण्यात आली. या ठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथकचे प्रमुख किरण वायसे हे शुक्रवारी वाहन तपासणी करीत असताना १० वाजता पांढर्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम.एच.१९ सी. झेड. ८५६९ ही आली. पथकातील लोकांनी वाहनाची तपासणी केली असता वाहनात एकूण ८ लाख ६५ हजार १०० रुपयांची रोख रक्कम मिळून आली.
वाहन मालक संतोष सुरेशकुमार बत्रा (वय ४४, रा.हनुमान नगर, भुसावळ) यांच्याकडे विचारणा केली असता ते उत्तर देऊ शकले नाही. वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आले व रोख रक्कम जप्त करून वाहनाचा पंचनामा करण्यात आला. वाहन, रोख रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आली. ही रक्कम कुणाकडे व कोणत्या कामासाठी दिली जात होती हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.