यावल येथील घटना : एकाविरोधात गुन्हा दाखल
यावल (प्रतिनिधी) : येथील यावल पोलीस ठाण्यात एका ३५ वर्षीय तरुणाने दारूच्या नशेत पोलिसांना शिविगाळ करीत त्यांच्याशी वाद घातला. समजूत काढणार्या पोलिसाची कॉलर पकडून त्याला जमिनीवर ढकलून दिले. ही घटना सोमवारी दि. २९ जुलै रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
यावल येथील पोलीस ठाण्यात सोमवारी सायंकाळी संशयित भरत गणेश सोनवणे (वय ३५, रा.वढोदा) हा तरुण आला होता. दारूच्या नशेत त्याने पोलिसांना शिविगाळ करायला सुरुवात केली. ठाणे अंमलदार शांताराम तळेले यांनी त्याला वाद न घालण्याचे आवाहन केले. मात्र तरुणाने न ऐकल्यानंतर हवालदार मुस्तफा तडवी यांनी समजूत काढली असता तरुणाने उलट हवलदार मुस्तफा तडवी यांची कॉलर पकडून त्यांच्याशी धक्काबुक्की केली. शासकीय गणवेशाचे बटन तोडून त्यांना जमिनीवर फेकले. याप्रकरणी मुस्तफा तडवी यांच्या फिर्यादीवरून भरत सोनवणे यांच्या विरुद्ध शासकिय कामात अडथळा निर्माण करणेसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.