महापालिकेच्या स्थायी सभेची मान्यता
जळगाव, (प्रतिनिधी) – महानगरपालिकेच्या स्थायी समितीने बुधवारी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा सुधारित १५२५.१२ कोटी रूपयांचा अर्थसंकल्प मंजूर केला. शहराचा रखडलेला विकास आणि जळगावकरांच्या मूलभूत गरजा लक्षात घेता, प्रशासकीय आराखड्यात स्थायी समितीने ५२ कोटी ४७ लाख १७ हजार रुपयांची भरघोस वाढ सुचविली आहे. या अर्थसंकल्पातून रस्ते, गटारी, शिक्षण आणि आरोग्य या चतु:सूत्रीवर सर्वाधिक भर देण्यात आला असून, जळगावचा कायापालट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. यंदाही कुठलीही करवाढ नाही.


शहरातील खड्डेमुक्त रस्ते आणि तुंबणाऱ्या गटारींच्या प्रश्नावर स्थायी समितीने तिजोरी खुली केली आहे. नवीन रस्त्यांसाठी भांडवली खर्चात १५ कोटींची मोठी वाढ सुचवत एकूण ३० कोटींची तरतूद केली आहे. चालू वर्षासाठी रस्ते दुरुस्तीच्या निधीत ५ कोटींची भर घातली असून १० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. नवीन गटारींच्या कामासाठी १० कोटी, तर सध्याच्या गटारींच्या स्वच्छतेसाठी ५० लाख रूपये तरतूद केली होती. पण, त्यात १.३० कोटींची अतिरिक्त तरतूद करून एकूण १ कोटी ८० लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे गटारींची सुध्दा कामे यंदा चांगली होतील.
महापौर चषक व क्रीडा स्पर्धांसाठी ६० लाखांची तरतूद आहे. सार्वजनिक आरोग्य आणि शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. शहरातील मनपाच्या रूग्णालयातील प्रसुतीगृहांच्या सक्षमीकरणासाठी २० लाखांची तरतूद तरतूद केली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सुध्दा मनपाच्या रूग्णालयात खासगी रूग्णालयांसारख्या सुविधा मिळतील. स्मशानभूमीच्या सुधारणेसाठी २ कोटींचा वाढीव निधी दिला आहे. आरोग्य आणि अग्निशमन विभागासाठी नवीन वाहने खरेदी करण्यासाठी ५ कोटींची तरतूद केली आहे. तर नागरी शिक्षण आणि क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी महापौर चषक व क्रीडा स्पर्धांसाठी ६० लाखांची तरतूद करण्यात आली.
शहरातील नालेसफाईसासाठी २ कोटी रूपयांचा अंदाजी खर्च मनपाकडून सादर करण्यात आला होता. मात्र, स्थायी समितीकडून या तरतूद कोटीची घट करत नालेसफाईसाठी १ कोटी रूपयांची तरतूद केली आहे. बगीच्यांच्या सुशोभीकरणसाठी ४० तर नवीन बगीच्यांसाठी दीड कोटी रूपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.









