महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त तंबाखूमुक्ती कार्यशाळा
जळगाव (प्रतिनिधी) : आजकाल वाढत्या व्यसनांच्या गर्तेत तरुणाई भरकटून व्यसनाधीन होत आहे. त्यामुळे तरुणांच्या जीवनात आठ प्रकारचे नुकसान होत आहे. त्यात मानसिक, आध्यात्मिक, शारीरिक, लैंगिक, पारिवारिक, आर्थिक, सामाजिक, नैतिक यांचा समावेश होतो. तसेच व्यसनाधीनतेमुळे ‘व्यसन’ करणाऱ्यांची प्रवृत्ती बदलून आत्महत्येकडे बळावत असल्याचे प्रतिपादन चेतना व्यसनमुक्ती उपचार केंद्राचे संचालक डॉ.नितीन विसपुते यांनी केले.
राष्ट्रीय महामार्गावरील पोदार शाळेजवळील जलाराम मंदिरालगतच्या चेतना व्यसनमुक्ती केंद्रात महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित तंबाखूमुक्त कार्यशाळेत ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून गांधीवादी विचारवंत कवी तथा लेखक ज्ञानेश मोरे, डॉ.ए.एम. चौधरी, डॉ.प्रमोद ठाकूर, डॉ.दिनेश महाजन, प्रा.हर्षल झांबरे आदी उपस्थित होते. सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांना भगवद्गीता भेट देण्यात आली. कार्यशाळेत सुमारे ७५ रुग्णमित्रांनी सहभाग घेतला होता. यावेळी सर्वांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली.
डॉ.नितीन विसपुते पुढे म्हणाले की, तंबाखूचे व्यसन करणाऱ्यांना क्रेविंगसाठी चांगली औषधी आणि घरगुती उपायही आहेत. त्यात आद्रकवडी, दालचिनी, जवस, अक्कलकरा यांचा समावेश आहे. तंबाखूची ‘तलफ’ आल्यास असे घरगुती उपाय केल्यास तंबाखूपासून मुक्ती मिळण्यास मदत होऊ शकते, असेही ते म्हणाले. तसेच कार्यशाळेत रुग्णमित्रांना तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनातून बाहेर कसे पडावे, याविषयी शाश्वत शाश्त्रोक्त पद्धतीने माहिती देऊन भयावह दुष्परिणामाविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी उपस्थित तज्ज्ञ मान्यवरांना रुग्णमित्रांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. कार्यशाळेत सहभागी झालेल्या रुग्णमित्रांना उपयुक्त मार्गदर्शन मिळाल्याने त्यांनी आयोजकांचे आभार मानले. याप्रसंगी गांधीवादी विचारवंत, कवी, लेखक ज्ञानेश मोरे, डॉ.ए.एम. चौधरी, प्रा. हर्षल झांबरे यांनी मार्गदर्शन करून मनोगत व्यक्त केले. यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर पाटील, तुषार ठाकूर, किरण बाविस्कर, दीपक पाटील, चेतन बोरसे यांच्यासह रुग्णमित्रांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक डॉ.प्रमोद ठाकूर तर आभार गणेश असूलकर यांनी मानले.