जामनेर तालुक्यातील माळपिंप्रीजवळची घटना
जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील कापूस व्यापाराला दुचाकीवरून पडून त्यांना लोखंडी टॉमीने मारहाण करत कपाशीचे आलेले उत्पन्न १८ लाख ३६ हजारांची रोकड लुटून नेल्याची खळबळजनक घटना जामनेर तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रमोद भागवत काळबैले (वय ३२, रा. माळपिंप्री ता. जामनेर) हे कापसाचा व्यापार करून उदरनिर्वाह करतात. दि. ३ जून रोजी रात्री ९.३० वाजता प्रमोद काळबैले हे त्यांच्या सहकारीसोबत दुचाकीने कापसाचे आलेले उत्पन्न १८ लाख ३६ हजारांची रोकड घेवून माळपिंप्री येथे जात होते. त्यावेळी त्यांच्या मागून अज्ञात दोरोडेखोर क्रुझरगाडीने आले व त्यांच्या दुचाकीला कट मारला. त्यात दुचाकीवरील दोघेजण रोडवर पडले.
क्रुझर वाहनातून आलेल्या दरोडेखोरांनी प्रमोद काळबैले यांना लोखंडी टॉमीने मारहाण करून त्यांच्या जवळील रोकड घेवून पसार झाले. या मारहाणीत दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना जळगाव येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी ४ जून रोजी सकाळी ५ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यानुसार पोलीसात अज्ञात ३ ते ४ दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर काळे हे करीत आहे.