मयत वृध्द पाडळसेचे माजी पोलीस पाटील
जळगाव (विशेष प्रतिनिधी)- शिरसोली -पाचोरा रस्त्यावरील हॉटेल प्रीतजवळ पायी जाणार्या एका वृध्दास एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना दि.2 रोजी सायंकाळी 7.30 वाजता घडली.
यावल तालुक्यातील पाडळसे येथील माजी पोलीस पाटील श्रीधर कौतिक तायडे (वय 70) हे जळगाव येथील त्यांचा मुलगा अनंत तायडे यांच्याकडे शुक्रवारी 2 रोजी येणार होते.पाडळसे येथून सकाळी 11.30 वाजता जळगाव बसस्थानकावर ते उतरल्याची मिळाली होती. मात्र त्यांची वाट चुकल्याने व वयोमानामुळे शिरसोलीकडे पोहचले. आज सायंकाळी 7.30 वाजता शिरसोली- पाचोरा रोडने पायी जात असतांना अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिल्याने त्यांना डोक्याला जबर मार लागला.त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी धाव घेत शिरसोली प्र.बो.पोलीस पाटील शरद पाटील, सुधाकर पाटील, गोलू पवार यांनी तात्काळ मदतकार्य केले.तसेच मयत वृध्दाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला.
मयत श्रीधर तायडे यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले, एक मुलगी, नातवंडे, असा परीवार आहे.त्यांनी पाडळसे येथे पोलीस पाटील म्हणून 1984 ते 1997 पर्यंत 13 वर्षे सेवा बजावली होती. रिक्षाचालक अनंत तायडे यांचे ते वडील होते.याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलीसात नोंद करण्याचे काम सुरू होते.