जळगाव (प्रतिनिधी ) – मोबाइल केवायसीच्या बहाण्याने जयकिसनवाडीत मेडिकल दुकान असलेल्या वृद्धाची ४९ हजार ५०० रुपयात ऑनलाईन फसवणूक झाली सोमवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जिल्हा रुग्णालयाजवळील हिरापन्ना अपार्टमेंटमध्ये प्रभाकर वामन कोल्हे ( वय ६७ ) हे वास्तवास आहेत . त्यांचे जयकिसनवाडी येथे मेडिकल दुकान आहे. सोमवारी दुपारी ते नेहमीप्रमाणे आपल्या मेडिकल दुकानांवर असतांना त्यांना त्यांच्या मोबाइलवर एसएमएस आला. या एसएमएसमध्ये मोबाइल क्रमांक केवायसी करा व त्यासाठी एका नंबरवर फोन करण्याबाबत नमूद होते. त्यानुसार प्रभाकर कोल्हे यांनी एसएमएसमध्ये दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. मोबाईलवर बोलणाऱ्या अनोळखी माणसाने कोल्हे यांचा विश्वास संपादन केला. त्यांना एनी डेस्क नावाचे अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यास सांगितले . कोल्हे यांनी अॅप डाऊनलोड केले त्यानंतर डेबीड कार्डच्या माध्मातुन दहा रुपयांचे चलन भरल्यास सांगितल्यावर तेसुद्धा कोल्हे यांनी भरले. ही प्रक्रिया करताच कोल्हे यांना त्यांच्या बँकेच्या खात्यातून २४ हजार ५०० , २० हजार व ५ हजार अशा पध्दतीने ४९ हजार ५०० रुपये काढण्यात आल्याचे संदेश आले. फसवणुकीची खात्री झाल्यावर प्रभाकर कोल्हे यांनी जिल्हापेठ पोलिस स्टेशन गाठले. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फसवणूक करणार्या अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो उ नि प्रदीप चांदेलकर हे करीत आहेत.