रावेर तालुक्यातील सावदा येथील घटना
रावेर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील सावदा शहरात कासार गल्ली परिसरात सोमवारी ८ डिसेंबर रोजी सायंकाळी पायी जाणाऱ्या एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोन्याची पोत दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून पळवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावदा येथील कासार गल्लीमध्ये राहणाऱ्या रत्ना दत्तात्रय कासार (वय ६२) या वृद्ध महिला सोमवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या इतर मैत्रिणींसोबत पायी जात होत्या. याच वेळी, दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्याजवळ थांबून अचानक त्यांच्या गळ्यातील सुमारे १ लाख ३२ हजार रुपये किमतीची दोन तोळ्याची सोन्याची पोत जबरदस्तीने हिसकावली आणि क्षणार्धात दुचाकीवरून पसार झाले.
पोत हिसकावल्यानंतर वृद्ध महिलेने तात्काळ आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत धूम ठोकली होती. नागरिकांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आले नाही. या घटनेनंतर रत्ना कासार यांनी तत्काळ सावदा पोलीस ठाण्यात धाव घेऊन रात्री तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील करत आहेत.







