जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील मुख्य पोस्ट ऑफिसमधील खात्यातून पैसे काढून बँकेत जाणाऱ्या वृद्धाच्या पिशवीला चिरा मारून अज्ञात चोरट्यांनी १ लाख रुपये लांबवल्याची घटना आज जळगावात घडली .
रामेश्वर कॉलोन परीसरात एकनाथनगरातील रहिवाशी देवराम बाबुलाल चौधरी ( वय ७२ ) मजुरी करून उदरनिर्वाह करतात . त्यांनी जळगाव शहरातील मुख्य पोस्ट ऑफिसमधील बचत खात्यात दीड लाख रुपये बचतीतून जमवले होते . पोस्टातील बचत खात्यात व्याज कमी मिळते म्हणून त्यांना ते पैसे इतर बँकेतील खात्यात टाकायचे होते . त्यासाठी घरी आणलेली पैसे काढण्याची स्लिप त्यांनी नातवाकडून भरून घेतली आणि पोस्ट ऑफिसमधून आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास पैसे काढले . पैसे काढल्यावर पोस्टातील रोखपाल महिलेला त्यांनी ही दीड लाखाची रक्कम पुन्हा मशीनवर मोजून दाखवा असा आग्रह धरला होता . त्यावर हे पैसे मोजलेले आहेत आणि दर्शनी भागातील नोटा मोजणारे यंत्र खराब झालेले आहे असे या रोखपाल महिलेने त्यांना सांगितले . त्यामुळे नंतर जवळपास २० मिनिटे पोस्टातच देवराम चौधरी यांनी स्वतः या नोटा मोजून पाहिल्या . या वेळेत त्यांच्याकडे असलेली ही रक्कम अनेकांच्या निदर्शनास आली असावी आणि तेथूनच त्यांच्यावर चोरट्यांनी पाळत ठेवली असावी , असा तर्क लावला जात आहे.