घातपाताचा आरोप, मृतदेह आणला पोलिस ठाण्यात
भुसावळ ( प्रतिनिधी ) – रावेर तालुक्यातील विवरा येथील तरुणाचा मृतदेह भुसावळ येथील तापी पुलाजवळ आढळून आला. याबाबत शहर भुसावळ पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती. आता बुधवारी त्याचा तापी नदीजवळ मृतदेह आढळून आला आहे. एका अल्पवयीन मुलीच्या नातेवाइकांनी धमकावल्यामुळे त्याने आत्महत्या केली असावी किंवा त्याचा घातपात झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. त्यामुळे गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

नातेवाइकांनी तरुणाचा मृतदेह निंभोरा पोलिस ठाण्यात आणला होता. जबाब नोंदल्यावर मृतदेह विवरे येथे नेण्यात आला. हितेश सुनील पाटील (वय २०) असे या तरुणाचे नाव आहे. हितेश हा जळगाव येथील त्रिमूर्ती महाविद्यालयात शिकत होता. शनिवारी त्याच्याशी संपर्क झाला नाही. त्यानंतर दि. १४ रोजी सकाळी त्याची दुचाकी तापी पुलाजवळ आढळून आली. त्यानंतर दि. १७ रोजी त्याचा मृतदेह मिळून आला.
या प्रकरणी मयताच्या नातेवाईकांनी निंभोरा येथे पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला. मृतदेहही पोलिस ठाण्यात आणला होता. घातपात झाल्याचा आरोप करत संबधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली. याबाबत भुसावळ येथे अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून, मयत हितेश पाटील याच्या वडिलांनी दिलेला जबाब भुसावळ शहर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात येणार असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक हरिदास बोचरे यांनी सांगितले.









