यावल तालुक्यातील विरावली गावाजवळ घटना
यावल (प्रतिनिधी) :- तालुक्यातील महेलखेडी येथील माहेर असलेली विवाहिता पतीसोबत दुचाकीद्वारे जात असताना विरावली गावाजवळ विवाहितेने दुचाकी थांबवली. तसेच, तेथील शेतातील विहिरीत धावत जाऊन उडी घेतली. हा प्रकार निदर्शनास येताच पतीने आरडाओरड केल्यानंतर नागरिकांनी धाव घेत विवाहितेला विहिरीतून काढून यावल रुग्णालयात आणले. येथे डॉक्टरांनी तपासणी करून तिला मयत घोषित केले. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मुस्कान अल्ताफ तडवी (वय २०) असे मयत विवाहितेचे नाव आहे. मुस्कानला दुचाकीवर घेऊन तिचे पती अल्ताफ रहेमान तडवी हे गावी जात होते. विरावली गावाजवळ शेत गट क्रमांक ५७ येथे विवाहितेने पतीला दुचाकी थांबवण्याचे सांगितले. मुस्कानने दुचाकीवरून उतरून थेट शेतातील विहिरीत उडी घेतली.(केसीएन)हा प्रकार तिच्या पतीने पाहून आरडाओरड केली. नागरिकांनी तेथे धाव घेऊन विवाहितेला विहिरीतून बाहेर काढले व यावल ग्रामीण रुग्णालयात आणले. यावल ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून विवाहितेला मयत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, विवाहितेला तिच्या पतीनेच विहिरीत ढकलून दिल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरच्या लोकांनी केला आहे. पुढील तपास डीवायएसपी कृष्णांत पिंगळे, पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे करीत आहे.