जळगाव शहरातील द्वारकानगरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील द्वारकानगरातील एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दि. १० मे रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी सासरच्या चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चारही जणांना अटक करण्यात आली आहे.
रुपाली मनोहर माळी (३२, रा. द्वारकानगर, जुना खेडी रोड) असे मयत विवाहितेचे नाव आहे. रुपालीने दि. १० मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या विषयी रुपालीची बहीण प्रियंका माळी यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद देऊन सासरच्या मंडळींकडून रुपालीचा सतत छळ केला जात होता, असे म्हटले आहे. तसेच त्यांनीच बहिणीला आत्महत्या करण्यास भाग पडल्याचेही नमूद केले आहे.
त्यावरून पती मनोहर यशवंत माळी, सासू सुशीला माळी, सासरे यशवंत दोधू माळी, दीर तुषार माळी (सर्व रा. द्वारकानगर, जुना खेडी रोड) या सर्वांविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चारही जणांना अटक करण्यात आले आहे. पुढील तपास पोउनि चंद्रकांत धनके करीत आहेत.