जळगाव शहरात पिंप्राळा हुडको येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात राहणाऱ्या एका ४५ वर्षीय प्रौढ व्यक्तीने जवळील जंगलात विषारी औषध घेतल्याने त्याचा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी दि. २७ मे रोजी रात्री १० वाजता मृत्यू झाला.या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जितू सोमा अहिरे (वय ४५, रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) असे मृत प्रौढाचे नाव आहे. जितू अहिरे हे त्यांची पत्नी आणि तीन मुलींसोबत पिंप्राळा हुडको परिसरात राहत होते. आठ दिवसांपूर्वी दि. २० मे रोजी त्यांनी पिंप्राळा हुडको परिसरातील जंगलात जाऊन विषारी औषध सेवन केले होते. त्यांची प्रकृती खालावल्याचे लक्षात येताच, त्या परिसरात बकऱ्या चारणाऱ्या मजुरांनी त्यांना पाहिले आणि तातडीने उचलून शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच, अखेर मंगळवारी रात्री १० वाजता जितू अहिरे यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.