जळगाव (प्रतिनिधी) : येथील विचार वारसा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख यांचा सर्वोत्कृष्ट सामाजिक कार्य केल्याबद्दल सूर्या फाउंडेशन तर्फे शहराचे आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. याबद्दल मेहरूण परिसरातून तसेच विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
विचार वारसा फाउंडेशनच्या माध्यमातून मेहरूण परिसरामध्ये अनेक वर्षांपासून विशाल देशमुख हे सामाजिक कार्य करीत आहे. सामाजिक कार्यासोबत शैक्षणिक, सांस्कृतिक, वैद्यकीय आदी क्षेत्रात देखील विशाल देशमुख यांनी कार्यकर्त्यांच्या सोबतीने स्तुत्य उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन खान्देश करियर महोत्सवनिमित्त सूर्या फाउंडेशनतर्फे त्यांचा स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते भावपूर्ण सन्मान करण्यात आला. यावेळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी अनंत राऊत, स्वामी समर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज पाटील, सूर्या फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. अर्चना सूर्यवंशी, शांताराम सुर्यवंशी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.