दादावाडी परिसरातील मयुरेश्वर कॉलनीत शोककळा
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील निमखेडी शिवारात रेल्वे पुलाजवळ तसेच बांभोरीच्या दिशेने असणाऱ्या गिरणा नदीमध्ये शुक्रवार दि. ३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास देवीमातेच्या मूर्तीचे विसर्जन करण्यास गेलेला तरुण वाहून गेल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर देखील तरुण मिळून आला नाही. त्यामुळे मदत कार्य थांबवण्यात आले आहे.

हिमेश संतोष पाटील (वय १९, रा.मयुरेश्वर कॉलनी, दादावाडी परिसर, जळगाव) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. परिवारासह तो राहत होता. दरम्यान शुक्रवारी दि. ३ सप्टेंबर रोजी दुपारी साडेअकरा वाजता निमखेडी रेल्वे पुलाजवळ मित्रांसोबत विसर्जन करण्यासाठी निघाला होता.(केसीएन) दुपारी १२ वाजता रेल्वे पुलाजवळ हिमेश पाटील याने देवी मातेच्या मूर्तीचे विसर्जन केले. त्यानंतर पाय घसरून तो नदीपात्रात वाहून गेला. महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्या ठिकाणी त्यांनी बचाव कार्य सुरू केले. रेल्वे पुलाच्या खाली तसेच बांभोरी गावाच्या दिशेने, नवीन हायवे तयार झाला आहे त्या दिशेला देखील त्यांनी शोध कार्य केले.(केसीएन)मात्र हिमेश पाटील आढळून आला नाही. संध्याकाळी अंधार पडल्यामुळे शोध कार्य थांबवण्यात आले.
शोधकार्यासाठी जळगाव महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे अधिकारी शशिकांत बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहन चालक देविदास सुरवाडे, संतोष तायडे, महेश पाटील, रवी भोई, रोहिदास चौधरी, संदीप कोळी, तसेच सर्पमित्र जगदीश बैरागी यांनी शोध कार्य केले.









