राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाचे कुलगुरूंना निवेदन
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील मविप्र संस्थेशी संबंधित गुन्ह्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठचे कुलसचिव विनोद पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे विद्यापीठाची बेअब्रू होत आहे. त्यामुळे त्यांना निलंबित करून तत्काळ कुलसचिव पदाचा भार काढून त्यांना कार्यमुक्त करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे कार्यकर्त्यांनी कुलगुरूंना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कुलसचिव नेहमी कोणाच्या तरी दबावाखाली येऊन काम करत असताना दिसत आहेत. आज ते संशयित आरोपी झालेले असून त्यांच्याकडील पदभार तात्काळ काढण्यात यावा. तसेच त्यांच्या जागी जबाबदार, प्रामाणिक, संशयित आरोपी नसलेली व्यक्ती नेमण्यात येऊन आपल्या विद्यापीठाची झालेली मलीन प्रतिमा सुधारण्यास मदत होइल. सदर प्रकरणात कुलसचिव यांच्यासोबत कुठल्या कुठल्या अधिकाऱ्यांनी त्यांना मदत केली आहे त्यांचा देखील पदभार काढण्यात यावा.
शासन आदेश व महाराष्ट्र नागरिक सेवा नियमानुसार कर्मचाऱ्यांचेविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यावर त्याला तात्काळ सेवेतून निलंबित करणेबाबत कायदेशीर बंधन आहे. त्यामुळे आपल्या विद्यापीठातील कुलसचिव दि. ८ जानेवारी रोजी होणाऱ्या पदवीदान समारंभात कुलपती महोदयांसोबत सहभाग नोंदवतील. हे राजकीय शिष्टाचाराचे उल्लंघन करणारे आहे.ह्यासाठी कुलसचिव विनोद पाटील ह्यांना पदमुक्त करण्यात यावे यासाठी निवेदन देण्यात आले. त्याप्रसंगी ऍड. कुणाल पवार, राविकाँग्रेस जिल्हाध्यक्ष निशांत चौधरी, कल्पेश भोईटे, ऍड. प्रवीण पाटील, नितिन जाधव, अझर शेख, प्रशांत बेहरे आदी उपस्थित होते.