बीड (वृत्तसंस्था ) – शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या पार्थिवावर बीडमध्ये शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांकडून विनायक मेटेंना मानवंदना देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा नेत्या पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. विनायक मेटे यांच्यावर बीडमधील उत्तमनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मेटे यांना अखेरचा निरोप देताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले होते.
विनायक मेटेंना अखेरचा निरोप देण्यासाठी बीडकरांनी अलोट गर्दी केली होती. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मोटार अपघातात रविवारी विनायक मेटे यांचे निधन झालेमेटे कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याची प्रतिक्रिया यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीसाठी ते मुंबईच्या दिशेने निघाले होते. विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाबाबत शंका उपस्थित केली जात असल्याने मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, विनायक मेटे यांच्या पत्नी डॉक्टर ज्योती मेटे यांनीही पतीच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे.