जिल्हा प्रशासनाच्या नियमाप्रमाणे नोंदणी आवश्यक
जळगाव (प्रतिनिधी) : किरकोळ विक्रेत्यांसह विविध ठिकाणी छोटी-मोठी दुकाने थाटून विनापरवानगी फटाके विक्री करणाऱ्यांवर प्रशासकीय यंत्रणेकडून थेट कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
दिवाळीत फराळ, नवीन कपडे, विविध खरेदीबरोबरच फटाक्यांच्या खरेदीला विशेष महत्त्व असते. जिल्हा प्रशासनाच्या नियमानुसार सर्व बाबींचे काटेकोर पालन करूनच फटाके विक्री करणे आवश्यक आहे. किरकोळ विक्रेत्यांसह विविध ठिकाणी छोटी-मोठी दुकाने थाटून विनापरवानगी फटाके विक्री करणाऱ्यांवर प्रशासकीय यंत्रणेकडून थेट कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे फटाके विक्रेत्यांसाठी अर्ज प्रक्रियेनंतर त्यांच्या दुकानांची, दुकानातील मालाची माहिती घेऊन परवानगी असलेल्या फटाक्यांना विक्री करण्यास मान्यता दिली जाते.
यासाठी जिल्हा प्रशासनातील विविध विभागांच्या मान्यता घ्याव्या लागतात. महापालिकेच्या अग्निशमन दलाचा परवाना लागतो. पोलिस आणि इतर ना हरकत प्रमाणपत्र संबंधितांना द्यावे लागते. शहरात या दृष्टीने प्रशासनाची तयारी सुरू आहे. फटाके विक्रीसाठी प्रशासनाचा परवाना असणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा विनापरवाना फटाका विक्री केल्यास दंडात्मक कारवाई होते. शहरात १२५ डेसिबल आवाजाची मर्यादा आहे. कर्कश आवाज करणारे फटाके फोडू नयेत. कमी आवाजाचे फटाके फोडून पर्यावरणाला साथ द्यावी. कानठळ्या बसणारे, आवाज होणारे फटाके फोडू नयेत.
एखाद्या ठिकाणी डेसिबलची मर्यादा ओलांडल्यास त्याविरोधात स्थानिक पोलिस ठाणे व प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाई केली जाते. न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई होते. त्यासाठी नियमाच्या अधीन राहून सण-साजरे करून प्रदूषण टाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.