एमआयडीसी पोलिसांची कामगिरी
जळगाव ( प्रतिनिधी ) – चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी आणलेल्या दीपक प्रेमसिंग सोळंके (रा. वरठाण, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) याला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत केल्या.
अजिंठा चौफुली परिसरात दीपक सोळंके हा चोरीची दुचाकी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. त्यांनी पोउनि राहुल तायडे, चंद्रकांत धनके, योगेश बारी, विशाल कोळी, राहुल रगडे, फिरोज तडवी यांना कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने तांत्रिक विश्लेषण करीत अजिंठा चौफुली परिसरात सापळा रचला व दीपकला ताब्यात घेतले. दुचाकीचीबाबत चौकशी केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखविताच ही दुचाकी जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याची कबुली दिली. या दुचाकीसोबत जळगाव शहरातून तीन, छत्रपती संभाजीनगरातून एक आणि अडावद येथून चोरलेली एक अशा पाच दुचाकी काढून दिल्या. पोलिसांनी त्या जप्त केल्या असून संशयिताला शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.