जळगाव (प्रतिनिधी) :- विजेच्या तारावर पाय पडल्याने एका सोळा वर्षीय मुलाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी १ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास गणेश कॉलनीत घडली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नातेवाईकांनी आक्रोश केला होता.
सुनिल संजय चव्हाण (वय-१६, रा. मन्यारखेडा ता.भुसावळ असे मयत मुलाचे नाव आहे. सुनिल चव्हाण हा जळगावातील बोहरा गल्लीतील बांधकामाच्या ठिकाणी आईवडील व बहिण यांच्यासोबत वास्तव्याला आहे. बोहरा गल्लीतील अग्रवाल फॅन्सी फटाके दुकानाचे मालक अनिल अग्रवाल यांनी त्यांच्या गणेश कॉलनीतील घरी साफसफाई करण्यासाठी सुनिल चव्हाण आणि त्याचा मित्र सागर सुभाष शिंदे यांना बुधवारी १ नोव्हेंबर रोजी सकाळी पाठविले होते.
सुनिल चव्हाण आणि सागर शिंदे हे दोघे गणेश कॉलनीतील घरी साफसफाई करत असतांना सुनिलचा पाय खाली पडलेल्या तारेला स्पर्श झाल्याने त्याचा जागेवरच दुदैवी मृत्यू झाला. ही घटना सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. यावेळी नातेवाईकांनी रूग्णाालयात आक्रोश केला होता. याबाबत अद्याप पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.