भुसावळ तालुक्यात फुलगाव येथील उड्डाणपुलाखालील अपघात
भुसावळ (प्रतिनिधी) :- भाऊबीजनिमित्त वरणगावला बहिणीकडून ओवाळणी केल्यानंतर भुसावळला परत येत असताना फुलगाव उड्डाणपुलाखाली झालेल्या २ दुचाकींच्या भीषण अपघातात साकेगाव येथील वीटभट्टी व्यावसायिक तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी २३ रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनील शंकर कुंभार (वय ४५) असे मयत तरुणाचे नाव आहे. सुनील कुंभार यांच्या पश्चात आई-वडील पत्नी दोन भाऊ मुलगा, मुलगी असा परिवार आहे. सुनील कुंभार हे मोटारसायकलने (एमएच १९ ईई ५७७३) फुलगावकडे जात असताना, समोरून येणाऱ्या विना क्रमांकाच्या मोटारसायकलने भरधाव वेगात सुनील यांच्या मोटारसायकलला समोरून धडक दिली. या धडकेत सुनील गंभीर जखमी झाले.
गावकऱ्यांच्या मदतीने त्यांना ग्रामीण रुग्णालय, वरणगाव येथे दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी भुसावळ येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी सुनील कुंभार यांना दाखल होण्यापूर्वीच मृत घोषित केले. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून विना क्रमांकाचा सुझुकी स्कुटीचा चालक घटनास्थळावरून पसार झाल्याचे समजते. याप्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









