एरंडोल तालुक्यातील नागदुली येथील घटना
एरंडोल (प्रतिनिधी) : तालुक्यातील नागदुली शिवारातील शेतात दुपारी अचानक आलेल्या पाऊस व वादळामुळे अचानक वीज कोसळल्याने ३५ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दि. १२ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने तरुणाचे वडील थोडक्यात बचावले आहे. या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
श्रीकांत उर्फ भैय्या भिका पाटील (वय-३५, रा. नागदुली ता. एरंडोल) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. श्रीकांत याच्या पश्चात आई सखुबाई, वडील मुलगा गणेश, दोन मुली रिया आणि अनिता तसेच पत्नी जागृती आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. शेतीचे काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करत होता. त्यांचे नागदुली शिवारात शेत आहे. शुक्रवार दि. १२ एप्रिल रोजी श्रीकांत हा त्याच्या पित्यासह शेती कामासाठी शेतात गेला होता.
दुपारी ४ वाजेच्या सुमारास वादळीवारासह पाऊस झाला. त्यावेळी श्रीकांत हा वडील भिका लक्ष्मण पाटील आणि काही मजुरांसोबत शेतातील चारा कुट्टी जमा करत होते. श्रीकांत हा तरुण लाकूड घेण्यासाठी बाजूला जात असताना अचानक त्याच्या अंगावर वीज कोसळली. त्यामुळे तो बाजूला फेकला गेला. घटना वडिलांना समजताच् त्यांनी मजुरांच्या मदतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.
वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश पाटील यांनी तपासून मयत घोषित केले. दरम्यान एकुलता एक मुलगा गेल्याने वडील व नातेवाईकांनी रुग्णालयात एकच आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.