भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) – तालुक्यातील साकेगाव येथे शुक्रवारी रात्री चुडामण नगरातील एका घरावर वीज कोसळली. यात तरुणीचा मृत्यू झाला असून तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांनी घटनास्थळी पाहणी करून नुकसान भरपाई देण्याच्या सूचना केल्या आहेत.
हर्षा गणेश मनोरे (वय ३४, रा. चुडामण नगर, साकेगाव) असे मयत तरुणीचे नाव आहे. शुक्रवारी त्यांच्या घरावर रात्री वीज कोसळली. यात खिडकी तुटून घरात असलेल्या हर्षा मनोरे हिच्या अंगावर वीज पडल्याने ती भाजलेल्या अवस्थेत बाहेर आली. ग्रामस्थांनी तरुणीस तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान हर्षाचा मृत्यू झाला. तरुणीच्या पश्चात आई, वडील व बहीण असा परिवार आहे.
या घटनेची माहिती मिळताच शनिवारी आमदार संजय सावकारे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तहसीलदार नीता लबडे यांना या नैसर्गिक आपत्तीचा पंचनामा करण्याचे सांगितले. तसेच, मृत तरुणीच्या परीरवाराला भरपाई देण्याची सूचना केली. दरम्यान मृत हर्षा मनोरे या एमएस्सी शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या प्रतीक्षेत होत्या. या घटनेमुळे साकेगावात हळहळ व्यक्त करण्यात आली.