एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा, रिंगणगाव येथे कारवाई
जळगाव ( प्रतिनिधी ) – विद्युत वाहीनीवर आकोडा टाकून तसेच बायपास करुन वीज चोरी करणाऱ्या दीपक बाजीराव महाजन (रा. रिंगणगाव, ता. एरंडोल) व विकास भास्कर पाटील-महाजन (रा. पिंपळकोठा, ता. एरंडोल) या दोघांवर महावितरणकडून कारवाई करण्यात आली. त्या दोघांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महावितरणमधील सहाय्यक अभियंता युवराज जालम तायडे यांना एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव कक्ष कार्यालयांतर्गत येत असलेल्या पिंपळकोठा प्र. चा. येथे वीजचोरी होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ते तंत्रज्ञ अख्तर लिंयाकत शाह व इतर कर्मचाऱ्यांसह दि. ६ ऑक्टोंबर २०२३ रोजी पिंपळकोठा येथे गावामध्ये गेले. यावेळी त्यांना विकास भास्कर पाटील हे विद्युत वाहिनीवरुन आकोडा टाकून वीजचोरी करतांना आढळून आले. त्यांनी गेल्या वर्षभरात १३ हजार ८५० रुपयांची वीज वापरलेली. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील दीपक बाजीराव महाजन यांच्याकडे महावितरणचे वीजमिटर होते. मात्र तरी देखील त्यांनी वीजमिटरच्या इन्कमिंग सर्विस वायरला अनधिकृतपणे दुसऱ्या वायरने जोड देवून मिटर बायपास केले होते. हा प्रकार दि. १० एप्रिल २०२४ रोजी उघडकीस आला होता. याप्रकरणी त्यांनी वर्षभरात १७ हजार १९० रुपयांची वीज अप्रमाणिकपणे चोरल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.