जळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोव्हीड रुग्णालयांसह सर्व अत्यावश्यक सेवा तसेच ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी जळगाव परिमंडलात महावितरणचे अधिकारी, अभियंते व कर्मचारी अविरतपणे कर्तव्य बजावत आहेत.
खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात महावितरणचे अभियंते, तंत्रज्ञ, यंत्रचालक व बाह्यस्रोत कर्मचारी सुरळीत वीजपुरवठ्यासाठी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये अविरत काम करत आहेत. यासोबतच तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या साह्यासाठी व्यवस्थापनातील अतांत्रिक अधिकारी कर्मचारीही सेवा बजावत आहेत. कोरोनाच्या आपत्तीत कर्तव्य बजावताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांनाही कोरोना विषाणूचा संसर्ग झाला. त्यातून बरे होऊन अनेकजण कर्तव्यावर रुजू झाले आहेत. दुर्दैवाने काही कर्मचाऱ्यांचा कोरोनाशी लढताना मृत्यू झाला. मात्र तरीही कोरोनाच्या संकटाला न डगमगता सामोरे जात खान्देशातील महावितरणचे कर्मचारी ग्राहकांच्या सेवेसाठी अखंड राबत आहेत.