यावल तालुक्यात शिरसाड येथे घटना
यावल (प्रतिनिधी):- शेत शिवारात विहिरीजवळ असलेल्या झाडावरून गुलाब तोडत असताना अचानक तोल जाऊन विहिरीत पडल्याने २२ वर्षीय तरुणीचा बुडून मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना शिरसाड ता. यावल येथे बुधवारी सकाळी घडली. लक्ष्मी दिलीप सपकाळे (वय २२, रा. शिरसाड, ता. यावल) असे मृत तरुणीचे नाव आहे.


शिरसाड येथील रहिवासी लक्ष्मी सपकाळे ही बुधवारी सकाळी गावाजवळील रमेश शिवदास बडगुजर यांच्या शेतात (गट क्र. ७७) गेली होती. तेथे विहिरीच्या काठावर असलेल्या गुलाबाच्या झाडावरून ती फुले तोडत होती. फुले तोडत असताना अचानक तिचा पाय घसरला आणि तोल गेल्याने ती थेट विहिरीच्या पाण्यात कोसळली. रुग्णालयात नेण्यापूर्वीच प्राणज्योत मालवली. हा प्रकार लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तातडीने विहिरीकडे धाव घेतली आणि लक्ष्मीला पाण्याबाहेर काढले.
तिला तात्काळ उपचारासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी अंती तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे शिरसाड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात किरण दिलीप सपकाळे यांनी दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रोहील गणेश पुढील तपास करत आहेत.









