आ. मंगेश चव्हाण यांच्या तक्रारीनंतर प्रशासनाची धडक कारवाई
पैसे मागणाऱ्या कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची पोलिसांमार्फत चौकशी करण्याचे सांगत ज्या शेतकऱ्यांकडून पैसे घेण्यात आले आहेत, त्यांनी तक्रार देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन आ. चव्हाण यांनी केले होते. आ. मंगेश चव्हाण यांच्या आक्रमक पावित्र्याची दखल घेत पंचायत गटविकास अधिकारी अ.अ.शेख यांनी मनरेगा कक्षातील राहुल अहिरे, विलास पाटील व संदीप रणदिवे या ३ कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करून जळगाव येथे हजर होण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच मनरेगा कक्षातील तांत्रिक सहाय्यक राज पाटील, राकेश पाटील, राहुल पाटील, प्रसाद चौधरी, पंकज तायडे, धीरज मराठे, विष्णू महाले या ७ तांत्रिक सहाय्यक यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. सदर पत्रात गटविकास अधिकारी यांनी सदर कर्मचारी यांना यापूर्वी देखील दिनांक २२ मार्च व २३ एप्रिल २०२५ रोजी बैठक घेऊन सूचना दिल्या होत्या, मात्र तरीदेखील त्यांनी आपल्या वर्तनात सुधारणा केली नसल्याची गंभीर बाब नमूद केली आहे.
पेव्हर ब्लॉकच्या कामांमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार पंचायत समिती मार्फत मनरेगा अभिसरण अंतर्गत सन २०२३ २४ व २०२४-२५ या दोन वर्षात मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्ते व पेव्हर ब्लॉक ची कामे मंजूर केली गेली आहेत. या कामांच्या मंजुरी व बिल काढण्याच्या प्रक्रियेत पंचायत समितीचे त्यावेळेचे गटविकास अधिकारी व मनरेगा विभागातील कंत्राटी कर्मचारी यांनी संगनमताने व आपल्या अधिकारांचा गैरवापर करत मोठी अनियमितता केल्याच्या तसेच मंजूर कामे निकृष्ट दर्जाचे झाले असल्याच्या तक्रारी आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे प्राप्त झाल्या आहेत.
विशेषकरून काम अपूर्ण असताना देखील कुशल बिल रेकॉर्ड करणे, ग्रामरोजगार सेवक यांच्या सही शिवाय मस्टर मागणी करणे व मस्टर काढणे असे प्रकार झाले आहेत. तसेच अंदाजपत्रकापेक्षा कमी व निकृष्ट दर्जाचे काम झाले असताना देखील पंचायत समिती गटविकास अधिकारी व सबंधित मनरेगा कक्षातील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहाय्यक यांनी कुशल/अकुशल बिल रेकॉर्ड करून पाठवले आहेत. हा अनेक कोटींचा अपहार असून विहिरी सोबत या प्रकरणात देखील चौकशी होऊन गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती आहे.