जामनेर तालुक्यातील अंबिलहोळ येथील घटना
जामनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील अंबिलहोळ येथे विहीर खोदकाम करण्याचे काम चालू असताना अचानक भीषण स्फोट झाला. या घटनेत ३२ वर्षीय तरुण ठार झाला असून आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.
ब्लास्टिंगच्या स्फोटात राहुल वाघ (वय ३२, रा. मुंदखेडा ता. जामनेर) यांचा जागीच मृत्यू झाला. भूपेश चव्हाण (वय २२, रा. अंबीलहोळ ता. जामनेर) गंभीर जखमी झाला. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की एकच पळापळ झाली.स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. गंभीर जखमी भूपेश चव्हाण यांना तातडीने पुढील उपचारासाठी जळगाव शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्यांनी पीडित कुटुंबीयांना धीर दिला.
तसेच जखमीना तातडीच्या उपचारांसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून स्फोटाच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. विहिरीच्या कामासाठी घेतल्या जाणाऱ्या सुरक्षेच्या उपाययोजनांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच मयताच्या नातेवाईकांनी मन हेलावणारा आक्रोश केला.