* कर्मचारी संघटनांचा आक्रमक पवित्रा; संचालकांशी बैठक आटोपली
* रात्री होणार शिक्षणमंत्र्यांशी चर्चा

जळगाव (प्रतिनिधी) – विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सुरु असलेले आंदोलन बुधवारी ३० रोजी काहीशा निर्णायक वळणावर येऊन ठेपले आहे. दुपारी उच्च व तंत्र दोन्ही शिक्षण संचालकांशी कर्मचारी संघटनाची बैठक आटोपली असून प्रमुख मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. दरम्यान आता रात्री ९ वाजता शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी संघटनेची ऑनलाईन चर्चा होणार आहे.
राज्यभरातील ११ अकृषी विद्यापीठातील व संलग्नित महाविद्यालयातील सुमारे २५ हजार पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी २४ सप्टेंबर पासून राज्यव्यापी आंदोलनाला बसलेले आहेत. आंदोलनामुळे विद्यापीठांच्या कारभारावर परिणाम होत असून विद्यार्थी देखील वेठीला धरले जात आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अंतिम वर्ष व सत्राच्या परीक्षा घेण्याचे नियोजन झाले होते. आता १ ऑक्टोबरपासून परीक्षा घेतल्या जाऊन त्याचा निकाल ३१ ऑक्टोबरपर्यंत जाहीर होणार होता. मात्र आंदोलनामुळे जळगावच्या कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्रसह काही विद्यापीठांनी अकार्यक्षम असल्याचे दाखवत परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्याचा जाहीर केले. यामुळे मार्च महिन्यापासून परीक्षांची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरु झाला आहे.
आता बुधवारी ३० रोजी विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचारी संघटनांनी उच्च शिक्षण संचालक धनराज माने आणि तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांच्याशी चर्चा केली. अकृषी विद्यापीठांना सातवा वेतन आयोग लागू करणे, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना पुनर्जीवीत करणे, तीन लाभांची आश्वासित प्रगती योजना लागू करणे ह्या प्रमुख मागण्या मंजूर करा लगेच आंदोलन मागे घेऊ आणि परीक्षा कामकाजाला सहकार्य करू अशी भूमिका संघटनांनी मांडली. तर उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांकडे मागण्या पोहोचवितो असा निरोप अधिकाऱ्यांनी दिला.
चर्चा करताना संघटनेचे रमेश शिंदे, अजय देशमुख, डॉ. नितीन कोळी, डॉ. दिनेश कांबळे, डॉ. सुनील दिवार, डॉ. पुरण मिश्रा, अरुण सपकाळे, सुदाम कांबळे, प्रवीण मस्तूत, प्रकाश म्हसे, डॉ. कैलास पाथ्रीकर, संजय कुबल, रावसाहेब त्रिभुवन, शिवराम लुटे आदी उपस्थित होते. दरम्यान आता सायंकाळी ७. ३० वाजता कर्मचारी संघटनांच्या कृती समितीची बैठक होणार असून त्यात अंतिम भूमिका तयार होणार आहे. रात्री ९ वाजता शिक्षणमंत्री कर्मचारी संघटनांचे म्हणणे ऐकून तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील.







