जळगाव ( प्रतिनिधी ) – विद्यापीठ अधिनियम 2016 सुधारणा विधेयक विद्यापीठाच्या स्वायतत्तेवर घाला घालत आहे असा आरोप करीत आज या विधेयकाची अभाविपकडून कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये प्रतीकात्मक होळी करण्यात आली
राज्य सरकारने स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी विद्यापीठ कायद्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील सर्व शासकीय विद्यापीठांचे कुलपती असलेले राज्यपालदेखील कुलगुरूंची थेट नियुक्ती करू शकणार नाही. यापुढे कुलगुरू निवड राज्य शासनाने सुचवलेल्या दोन नावांमधूनच राज्यपालांना करावी लागेल. राज्य शासन राज्यपालांच्या अधिकारात हस्तक्षेप करीत आहे. विद्यापीठामध्ये कुलपती पदावर प्र. कुलपती म्हणून एक नवीन पद निर्माण करण्यात आले असून त्यापदी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यावरून विद्यापीठांच्या स्वायतत्तेवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न राज्य शासन करीत आहे. यावरून स्पष्टपणे राजकीय पक्ष , नेते यांचा अवाजवी हस्तक्षेप निर्णय प्रक्रियेत वाढेल. राज्यपाल सर्व विद्यापीठांचे प्रमुख आहेत , त्यांच्या अधिकारांवर हे सर्वार्थाने आक्रमण आहे. या निर्णयाने गुणवत्ताधारक प्राध्यापक, विद्यार्थी यांच्यावर विपरीत परिणाम राजकीय दबावाने होऊ शकतो. विद्यार्थ्यांना प्रत्येक निर्णयामध्ये राज्य शासनाकडे बघावे लागेल. विद्यापीठांची गुणवत्ता पूर्णपणे ढासळण्याची शक्यता या निर्णयाने निर्माण होत आहे. विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे राजकीयकरण या निर्णयामुळे होईल , अशी अभाविपची भूमिका आहे .
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तर्फे कुलसचिवांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देत कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये विद्यार्थी आक्रोश मोर्चा काढून प्रतीकात्मक सुधारणा विधेयक पुतळ्याची होळी करण्यात आली.
हा कायदा रद्द करावा अन्यथा विद्यार्थी परिषद राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा अभाविपचे महानगर मंत्री रितेश महाजन , जिल्हा संयोजक इच्छेश काबरा यांनी राज्य शासनाला दिला. मेडिव्हिजन राष्ट्रीय सहसंयोजक शुभम भोलाणे यांनी या सुधारणा विधेयकाचा निषेध केला यावेळी नगरमंत्री आकाश पाटील, नगरमंत्री मयूर माळी व नितेश चौधरी यांनीही भावना व्यक्त केल्या.
या मोर्चामध्ये विविध महाविद्यालयाचे 100 पेक्षा अधिक विद्यार्थी , विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य रितेश महाजन यांनी केले.