काँग्रेस पक्ष वगळता इतरांना अतिरिक्त मतांची गरज
मुंबई (प्रतिनिधी) : विधान परिषदेची निवडणूक करिता अर्ज भरलेल्या १२ उमेदवारांपैकी कोणत्याच उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्यामुळे आता निवडणूक होणार हे स्पष्ट झाले आहे. भाजप ५, शिवसेना शिंदे गट २, राष्ट्रवादी अजित पवार गट २, शेतकरी कामगार पक्ष १, काँग्रेस १ व उबाठा शिवसेना १ असे १२ उमेदवार रिंगणात राहणार आहेत. त्यामुळे कोणत्या पक्षाचा उमेदवार पडणार याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.
प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी किमान २३ मते मिळवणे आवश्यक आहे. भाजपला आपले सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी ११५ मतांची आवश्यकता आहे. त्यांच्याकडे समर्थन देणाऱ्या अपक्ष मिळून ११३ मते आहेत. त्यांना अतिरिक्त २ मतांची तजवीज करावी लागणार आहे. शिंदे शिवसेनेला आणखी ६ मतांची तर राष्ट्रवादीला (अजित पवार) ७ अतिरिक्त मतांची गरज पडणार आहे. काँग्रेसकडे स्वबळावर आपला उमेदवार निवडून येण्याइतके मते असून त्यांच्याकडे अतिरिक्त १४ मतांचा कोटा आहे.
त्यामुळे उबाठा शिवसेनेला काँग्रेसचा उंबरठा झिजवावा लागणार आहे. ऊबाठाला तब्बल १६ मते इतर पक्षाला मागावे लागणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाने अगोदरच शेकापचे जयंत पाटील यांना समर्थन दिल्यामुळे उबाठा शिवसेनेची पंचाईत झाली आहे. मिलिंद नार्वेकर, जयंत पाटील की महायुतीतील कोणीतरी एक किंवा महायुतीतील एकाच बळी नक्की जाणार हे आता पक्के झाले आहे. जयंत पाटील यांच्या शेकापचे विधानसभेत एक दोन सदस्य असताना ते निवडून येतात अशी परंपरा राहिली आहे. यावेळी त्यांच्या पक्षाचा एकही सदस्य विधानसभेत नाही, असे असताना यावेळीही जयंत पाटील निवडून येतात काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दिनांक ११ जुलै नंतर विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागेल, त्याच वेळेला चित्र स्पष्ट होईल. निवडणुकीत भाजपकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे यांच्यासह मित्र पक्षाचे सदाभाऊ खोत, शिवसेना शिंदे गटाकडून विदर्भातील कृपाल तुमाने व भावना गवळी, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून राजेश विटेकर आणि शिवाजी गर्जे हे मैदानात आहेत. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील आणि काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.