सदाभाऊ खोत, राजेश विटेकर, जयंत पाटील डेंजर झोनमध्ये..!
मुंबई (प्रतिनिधी) : विधान परिषदेची निवडणूक करिता शुक्रवार दिनांक १२ जुलै रोजी मतदान घेण्यात आले. ४ वाजायला पंधरा मिनिटे शिल्लक असताना १०० टक्के मतदान पूर्ण झाले. एकूण २७४ आमदारांनी मतदान केल्यामुळे आता १२ पैकी कोणते ११ उमेदवार निवडून येतील ? याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. साधारण ५ वाजेला मतमोजणीला सुरुवात होणार असल्याची माहिती मिळाली.
भाजप ५, शिवसेना शिंदे गट २, राष्ट्रवादी अजित पवार गट २, शेतकरी कामगार पक्ष १, काँग्रेस १ व उबाठा शिवसेना १ असे १२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे कोणत्या पक्षाचा उमेदवार पडणार याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.
प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी किमान २३ मते मिळवणे आवश्यक आहे. काँग्रेसकडे स्वबळावर आपला उमेदवार निवडून येण्याइतके मते असून त्यांच्याकडे अतिरिक्त १४ मतांचा कोटा आहे. निवडणुकीत भाजपकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे यांच्यासह मित्र पक्षाचे सदाभाऊ खोत, शिवसेना शिंदे गटाकडून विदर्भातील कृपाल तुमाने व भावना गवळी, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून राजेश विटेकर आणि शिवाजी गर्जे हे मैदानात आहेत. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील आणि काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
विधान भवनामध्ये शुक्रवारी सर्व २७४ आमदारांनी मतदान केले. यामध्ये कारागृहात असणारे गणपत गायकवाड यांनाही मतदानाचा अधिकार न्यायालयाच्या आदेशाने बजावता आला. तर सर्वात शेवटी बहुजन विकास आघाडी आणि मनसेच्या आमदारांनी मतदान केले. संध्याकाळी ५ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार असून साधारण ६ ते साडेसहा वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे.