जळगाव ( प्रतिनिधी ) – धुळे – नंदुरबार विधानपरिषद मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेले उमेदवार अँड अशोक पाटील यांना उमेदवारी अर्जाची मागणी केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी कार्यालयातून अक्षरशः हाकलून दिले आणि अर्ज नाकारला ! हे आपल्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन असल्याचा आरोप करणारी याचिका अशोक पाटील यांनी आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे .
धुळे नंदुरबार विधानपरिषद निवडणुकीसाठी नेमलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली आहे आता या याचिकेवर 23 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे .
धुळे येथील रहिवाशी अशोक पाटील 16 नोव्हेंबररोजी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज घेण्यासाठी गेले होते, त्यांना तेथून चालते व्हा, तुम्हाला उमेदवारी अर्ज मिळणार नाही अशा भाषेत त्यांना कार्यालयातून हाकलून देण्यात आले, याचिकाकर्त्यांनी 16 व 17 नोव्हेंबररोजी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या, केंद्रीय व राज्य निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी दिल्या मात्र कोणीही दखल न घेतल्यामुळे शेवटी अशोक पाटील यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अँड विनोद पाटील यांच्यामार्फत 20 नोव्हेंबररोजी याचिका दाखल केली
अशोक पाटील हे व्यवसायाने वकील आहेत . धुळे नंदुरबार विधानपरिषद मतदारसंघातून त्यांना अमरिशभाई पटेल यांचे विरोधात उमेदवारी अर्ज भरावयाचा आहे, 23 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणाऱ्या या याचिकेमध्ये याचिकाकर्त्यांनी , निवडणूक निर्णय अधिकारी , शासन व संबंधित विरोधी उमेदवार यांनी संगनमत करून कोणालाही उमेदवारी अर्ज देऊ नये व सर्व राजकीय पक्षांनी आपला आपले उमेदवार बिनविरोध करून घ्यायचे ठरवलेले आहे असे दिसते असे म्हटले आहे , असे करणे याचिकाकर्त्यांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारे आहे असे त्यांचे म्हणणे आहे.