जळगाव (प्रतिनिधी) – अट्रावल येथे मित्राच्या मुलीच्या लग्नाला जात असतांना दुचाकीला महिंद्रा पिकप मालवाहू वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार सागर राधेश्याम मोरे (वय २७), रा.ममुराबाद हा तरुण जागीच ठार झाला आहे.

विदगाव जवळ बुधवारी साडे दहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात दुचाकीच्या मागे बसलेला गोविंदा तुकाराम सोनवणे वय २४ रा.ममुराबाद हा जखमी झाला असून त्याला उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सागर मोरे व गोविंदा सोनवणे हे जिल्हाधिकारी कार्यालयातील शासकीय गोदामात हमाल म्हणून काम करतात. याच ठिकाणी कामाला असलेला त्यांचा मित्र युवराज बोरसे यांच्या मुलीचे बुधवारी यावल तालुक्यातील अट्रावल येथे लग्न होते. या लग्नासाठी सागर व गोविंदा हे एमएच १९ बीपी ७४१३ या दुचाकीने अट्रावलकडे जात होते. यादरम्यान विदगावच्यापुढे माल वाहु वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात सागर मोरे जागीच ठार झाला तर गोविंदा जखमी झाला. रुग्णवाहिकेने सागरचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. तर जखमी गोविंदा यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर मालवाहू वाहनांवरील चालक पसार झाला होता.
सागर याच्या पश्चात आई सिंधु, वडील राधेशाम, पत्नी पूजा मुलगा राघव (वय ७) मुलगी उज्ज्वला (वय ४ ) असा परिवार आहे. याबाबत पोलीस पुढील तपास करीत आहेत.







