मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांना एमपीएससी परीक्षा देता आल्या नाही त्या विद्यार्थ्यांना एक वर्षाची वयोमर्यादा वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, मंत्रिमंडळ बैठकीत आज मान्यता देण्यात आली असल्याचं सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी सांगितलं .
कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून एमपीएससीच्या परीक्षा लांबणीवर पडल्या होत्या. विविध संवर्गाच्या जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली नव्हती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं वयोमर्यादा वाढवून द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीदेखील विद्यार्थ्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळवली होती. राज्य सरकारच्या या निर्णयामुळं विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांना कोरोना काळात परीक्षा न झाल्यानं वयोमर्यादा संपल्यानं परीक्षा देता आली नव्हती. विद्यार्थ्यांची आणि अनेक राजकीय नेत्यांची वयोमर्यादा वाढवून देण्याची मागणी होती. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा झाली. विद्यार्थ्यांना एक वर्ष वाढवून देण्याचा निर्णय झाला, असं दत्तात्रय भरणे म्हणाले.
खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून एमपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वाढीव दोन संधी द्या अशी मागणी केली होती. कोरोनामुळं दोन वर्ष जाहिरात निघाली नाही, काही विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपली.चार वर्षांपासून परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येत नाहीत, असं त्यांनी म्हटलं होतं.