मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर न्यायालयाचे आदेश
जळगाव (प्रतिनिधी) : बऱ्हाणपूर येथील एका इसमाकडून ३० लाख रुपये घेऊन ते परत दिले नाही. त्यापोटी दिलेला धनादेशदेखील वटला नाही, म्हणून इसमाने संबंधिताविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेत बऱ्हाणपूर न्यायालयाने भुसावळ तालुक्यातिल वरणगावच्या इसमाला ४१ लाख रुपये याचिकाकर्त्याला अदा करण्याचे आदेश दिले आहेत. रक्कम अदा न केल्यास सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील गजानन जगन्नाथ महाजन (वय ५८) यांचे वरणगाव ता. भुसावळ येथील संजय नारायण देशमुख यांच्याशी मित्रत्वाचे संबंध आहेत. त्या संबंधातून संजय देशमुख याने महाजन यांच्याकडून ३० लाख रुपये हात उसनवारीने घेतले होते. ते वेळेत परत करेल, असे आश्वासनही त्याने दिले. रकमेच्या परतफेडीसाठी देशमुखने महाजन यांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वरणगाव ऑर्डिनन्स फॅक्टरी शाखेचा ३० लाखांचा धनादेश दिला. महाजन यांनी धनादेश वटविण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेच्या बहाणपूर शाखेत जमा केला.
मात्र, देशमुख यांच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने हा धनादेश वटला नाही. महाजन यांनी त्यानंतर रकमेसाठी देशमुखांकडे तगादा लावला. मात्र, रक्कम मिळाली नाही, म्हणून महाजन यांनी बऱ्हाणपूर न्यायालयात चेक बाऊन्सची याचिका दाखल केली. त्यात बऱ्हाणपूर न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायाधीश गुरुवेंद्र कुमार हुरवाडे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. त्यात देशमुख यांच्यावर दोष सिद्ध होऊन त्यांना सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. या रकमेपोटी व त्यावरील व्याज, दंड व अन्य रक्कम, अशी एकूण ४१ लाख ७४ हजार ४६० रुपये महाजन यांना अदा करावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत